पुरंदर रिपोर्टर Live
वाघळवाडी, सोमेश्वरनगर (ता. बारामती)
अंबामाता महिला ग्राम संघ, वाघळवाडी सोमेश्वर नगर यांच्या बचत गटातील तब्बल १५० महिलांसाठी भव्य देवदर्शन ट्रीपचे आयोजन करण्यात आले. हा आगळावेगळा उपक्रम अजितदादा युथ फाऊंडेशन, वाघळवाडी सोमेश्वर नगर बारामती यांच्या वतीने राबविण्यात आला. महिलांसाठी खास या देवदर्शन यात्रेचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यामध्ये एस.टी. महामंडळाने महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.
या यात्रेत महिलांना महाराष्ट्रातील अनेक नामांकित धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळाली. श्री गजानन महाराज शेगाव, छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिर, ऐतिहासिक वेरूळची लेणी, पाथर्डी येथील संत भगवान बाबा गड समाधी आणि शिर्डी साईबाबा मंदिर अशा पवित्र स्थळांना महिलांनी सामूहिक भेट दिली. सामूहिक प्रार्थना, भजन आणि आरतीमुळे यात्रेचा धार्मिक माहोल अधिकच भक्तिमय झाला.
प्रवास सुखकर व आनंददायी होण्यासाठी एस.टी. महामंडळाने उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या. आरामदायी बसेसमुळे संपूर्ण प्रवास समाधानकारक ठरला. महिलांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था शेगाव व शिर्डी येथे उत्तम प्रकारे करण्यात आली होती. त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त करत आयोजक तसेच परिवहन महामंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमाच्या यशामध्ये बारामती एस.टी. डेपोचे परिवहन महामंडळ निरीक्षक विशाल सावंत व सहाय्यक विकास सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या नियोजनामुळे प्रवासाचे वेळापत्रक सुरळीत व शिस्तबद्ध पार पडले. महिलांच्या सहभागात मा.सरपंच नंदा सकुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्याध्यक्ष बारामती तालुका सूचिता साळवे राष्ट्रवादी तालुका महिला सरचिटणीस मनीषा साळुंखे ग्राम संघाचे अध्यक्ष सुनिता सावंत ग्रामपंचायत सदस्य निर्मला केंगार यांनी विशेष पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली.
युवकांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम शक्य झाला नसता. उपसरपंच तुषार सकुंडे, हेमंत सावंत व उत्कर्ष माने यांनी वेळोवेळी महिलांना आवश्यक ती मदत करून प्रवासाचा आनंद द्विगुणीत केला. त्यांच्या सहभागामुळे ट्रीप उत्साहवर्धक आणि संस्मरणीय ठरली.
या देवदर्शन यात्रेमुळे महिलांना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असा त्रिगुणी अनुभव लाभला. महिलांनी या उपक्रमाचे एकमुखाने कौतुक करत भविष्यातही अजितदादा युथ फाऊंडेशनमार्फत अशाच अनेक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 Comments